आळंदी वार्ता : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत आळंदी नगरपरिषदेने प्रथमच शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आदर्श विद्यार्थी पुरस्कार २०२४-२५ चा भव्य वितरण समारंभ आयोजित केला. शुक्रवारी, २ मे रोजी सकाळी ९ वाजता फुटवाले धर्मशाळा, आळंदी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक १ ते ४ मधील ८ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान –
आदर्श विद्यार्थी पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांची निवड काटेकोर निकषांवर आधारित होती. यामध्ये विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती, वर्षभरातील परीक्षांमधील गुण, चारित्र्य, विविध उपक्रमांमधील सहभाग आणि खेळातील प्राविण्य यांचा विचार करण्यात आला. प्रत्येक शाळेतून पहिली ते पाचवी आणि सहावी- सातवी या गटांमधून प्रत्येकी एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली.
समृद्धी गजानन नरवडे, राधिका बालाजी केंद्रे, ईश्वरी बाबासाहेब सरवदे, ज्ञानराज रामेश्वर वैद्य, प्रणाली गोपाल भोयार,
आल्फीया यादुल पठाण, पार्थ जानकीदास वैष्णव, सृष्टी केशव गायकवाड हे विद्यार्थी यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.
या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी २,५०० रुपये रोख, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांना भविष्यात आणखी यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य –
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषद शिक्षण मंडळातील कुंभार सर आणि बहिरट सर यांनी प्रभावीपणे केले. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना शाळेतील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमधूनही आपली प्रतिभा सिद्ध करावी. आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १ लवकरच आदर्श शाळा म्हणून विकसित केली जाईल.”
डी. डी. भोसले पाटील यांनी नगरपरिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याची आणि पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद शाळांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची सूचना मांडली. यावर मुख्याधिकारी खांडेकर यांनी शासनाची परवानगी घेऊन क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
मान्यवरांची उपस्थिती –
या सोहळ्यासाठी डी. डी. भोसले पाटील, संजय धुंडरे, प्रशांत कु-हाडे, सचिन गिलबिले, दिनेश घुले, सागर भोसले, प्रकाश कु-हाडे, रोहिदास तापकीर, अशोकराव उमरगेकर, सुनिता रंधवे, रुक्मिणी कांबळे, गणेश रहाणे, सचिन काळे, संदेश तापकीर, ज्ञानेश्वर रायकर, श्रीधर कु-हाडे, राहुल चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिक, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सोनाली झिझुंर्डे, नगरपरिषद शाळा क्रमांक १ ते ४ चे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आणि शहरातील पत्रकारांचीही उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांचे मनोगत आणि पसायदान –
पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी शाळा, शिक्षक आणि नगरपरिषदेचे आभार मानले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. नगरपरिषदेच्या प्रशासन अधिकारी अर्चना भिसे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
नगरपरिषदेचा पथदर्शी उपक्रम –
आळंदी नगरपरिषदेच्या चार शाळांमध्ये एकूण २,१५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी प्रथमच हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. प्रत्येक शाळेतून दोन विद्यार्थ्यांची निवड करून एकूण ८ विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. याशिवाय, येत्या ५ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
सामाजिक आणि शैक्षणिक प्रभाव –
हा पुरस्कार सोहळा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला आहे. आळंदी नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून, भविष्यात अशा आणखी उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली आहे. आळंदी नगरपरिषदेच्या या पथदर्शी पावलामुळे संत नगरीतील शैक्षणिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.