Sunday

03-08-2025 Vol 19

आळंदी-डुडूळगाव शिव रस्त्याचे काम रखडले; आषाढी वारीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता धूसर

आळंदी वार्ता: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आळंदी-डुडूळगाव शिव रस्त्याचे काम अखेर सुरू झाले, परंतु स्थानिक रहिवाशांच्या हरकतींमुळे हे काम अर्धवट अवस्थेत थांबले आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा हा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून वापराविना पडून आहे. शिवाय, रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. झाडे आणि विद्युत खांब न हटवताच सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आल्याने वाहनचालकांसमोर ‘रस्ता असून अडचण’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

इंद्रायणीनगरचा रस्ताही खणला –

याशिवाय, काही महिन्यांपूर्वीच बांधलेला इंद्रायणीनगर आणि साखरे महाराज आश्रमामागील सिमेंट रस्ता जलवाहिनी टाकण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने खणला आहे. याबाबत भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी प्रशासनावर टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे, “जलवाहिनी टाकण्यापूर्वी रस्त्याचे काम का केले? आधी जलवाहिनी टाकून नंतर रस्त्याचे काम करता आले नसते का?”

पाणीपुरवठ्यासाठी खोदकाम अपरिहार्य –

आळंदीचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून अनियमित झाला होता. यासंदर्भात आमदार बाबाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी उपाय सुचवण्यात आले. यामध्ये नदीच्या पलीकडील आणि अलीकडील भाग स्वतंत्र करून मुख्य पाण्याची टाकी भरण्यास लागणारा सात ते आठ तासांचा वेळ वाचवण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल. यासाठी हे खोदकाम अपरिहार्य होते, असे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे अडथळा –

शिव रस्त्याच्या कामाला लगतच्या शेतकऱ्यांनी भूसंपादनाबाबत आक्षेप घेतल्याने काम रखडले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या शेतकऱ्यांना ‘अ ब’ पत्रक दिले आहे, तर आळंदी नगरपरिषदेने टीडीआर आणि एफएसआयबाबत पत्रव्यवहार केल्याचा दावा केला आहे. “आषाढी वारीपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्युत खांब आणि झाडे हटवण्याबाबतही पत्रव्यवहार झाला आहे,” असे खांडेकर यांनी सांगितले.

नागरिकांचे प्रश्न कायम –

आळंदी नगरपरिषदेने नागरिकांचे प्रश्न सोडवूनच काम सुरू केल्याचा दावा केला असला, तरी आक्षेपांनंतर काम का थांबवले, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. रस्त्याच्या कामाच्या दर्जासह प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

alandivarta