आळंदी वार्ता – आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदगुरु मारोतीबोवा गुरव यांच्या ८२व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने समस्त गुरव परिवार आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने दिला जाणारा आळंदी भूषण वारकरी पुरस्कार वेदांत सत्संग समितीचे डॉ. नारायण महाराज जाधव यांना प्रदान करून गौरविण्यात आले.
या सोहळ्यास आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, माजी सभापती डी. डी. भोसले, भाजपा नेते डॉ. राम गावडे, भाजपा शहराध्यक्ष किरण येळवंडे, विलास वाघमारे, अनिल वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, विश्वंभर पाटील, संकेत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. नारायण महाराज जाधव हे मूळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कर्जुले हरिया येथील रहिवाशी आहेत. घरात वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा लाभल्याने त्यांचे मन आळंदीकडे अध्ययनासाठी वळले. आळंदीत आल्यानंतर त्यांनी सदगुरु जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत संत साहित्याचा सखोल अभ्यास सुरू केला. गोपाळपुरा येथील कैवल्य आश्रमात आनंदस्वामी ऊर्फ दंतेस्वामी यांच्याकडे अनेक वर्षे राहून त्यांनी वारकरी पद्धतीचे शिक्षण घेतले. एकनाथी भागवत, विचारसागर, ज्ञानेश्वरी, वृत्तीप्रभाकर, पंचदशी यासह अनेक ग्रंथांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
डॉ. जाधव यांनी आळंदीत वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाठ घेऊन शेकडो कीर्तनकार, प्रवचनकार आणि साधकांना घडवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आळंदी भूषण वारकरी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत वारकरी संप्रदायाच्या प्रसारासाठी त्यांनी केलेल्या योगदानाला नमन केले.