आळंदी वार्ता : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थानच्या पवित्र सोहळ्यासाठी आळंदीत वारकऱ्यांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे. प्रस्थान सोहळ्याला अवघे चार दिवस शिल्लक असताना, इंद्रायणी घाट आणि आळंदी शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. १९ जून रोजी रात्री ८ वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून पालखी प्रस्थान होणार असून, पहिला मुक्काम आळंदीतच दर्शन मंडपात होईल. २० जूनला सकाळी ६ वाजता पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल, तर २० आणि २१ जून असे दोन दिवस पुण्यात मुक्काम करून ती पुढील प्रवासाला निघेल. भाविक वारकऱ्यांच्या सेवेसाठी आळंदी नगरपरिषद, माऊली देवस्थान, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या तयारीने अंतिम टप्पा गाठला आहे.
वारकरी दाखल होण्यास सुरुवात-
आळंदीत वारकरी दिंड्यांची वाहने आणि एस.टी. बसने येणारे भाविक दिसू लागले आहेत. भाविक माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेत आहेत. इंद्रायणी नदीच्या पात्रात स्नान, मातेची आरती आणि पूजा यांसह अनेकजण पारंपारिक वारकरी पोशाखात फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करताना दिसत आहेत. सिद्धबेट, विश्रांतीवड, माऊलींची भिंत अशा पवित्र स्थळांनाही वारकरी भाविक भेट देत आहेत.
वारकरी साहित्य दुकाने सजली-
वारकरी साहित्याची दुकाने तुळशी माळ, टाळ, पखवाज, वीणा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ यांसारख्या वस्तूंनी सजली असून, भाविक खरेदीत दंग आहेत. मंदिर परिसरात हार, फुले, प्रसादाची दुकानेही गजबजली आहेत. इंद्रायणी घाटावर वासुदेव दान मागताना दिसत असून, भक्तिमय वातावरणात सर्वत्र उत्साह आहे.
नगरपरिषद प्रशासन सज्ज-
आषाढी यात्रा पालखी प्रस्थान सोहळासाठी आळंदी नगरपरिषदेने वारकऱ्यांना सोयी सुविधासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी १८० मोबाईल टॉयलेट्स, १४ सार्वजनिक आणि ४ सुलभ शौचालयांसह १५३ सफाई कर्मचारी नेमण्यात आले आहेत. २० सुपरवायझर, २५ जेटिंग मशिन्स, २० सक्शन मशिन्स आणि ५ धूर फवारणी मशिन्स कार्यरत राहतील. पाणीपुरवठ्यासाठी १० टँकर्स आणि ४ फिलिंग पॉइंट्स उपलब्ध असून, PCMC, PMC आणि रोजगार हमी योजनेकडून २५ अतिरिक्त टँकर्स मिळणार आहेत.सुरक्षेसाठी २० वॉच टॉवर्स, ३ हिरकणी कक्ष, ६ नाकापॉइंट्स आणि ३० PAC सिस्टिम्स तैनात केल्या जातील. आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRF आणि नगरपरिषदेच्या टिम्स (प्रत्येकी २ आणि १ बोटसह), ४ अग्निशमन वाहने कार्यरत राहतील. विद्युत विभागाकडून ३७५ फ्लड लाइट्स, ५ LED स्क्रीन्स, १ जनरेटर (२५० Kva) आणि ५ इतर जनरेटर्स उपलब्ध होतील. २०० CCTV कॅमेरे आळंदी पोलीस स्टेशनच्या नियंत्रणाखाली असतील, अशी माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.