आळंदी वार्ता : आळंदी-वडगाव रस्त्यावर शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगाने जाणारी कार रस्ता ओलांडून थेट रस्त्यालगतच्या दुकानात घुसली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली. प्रत्यक्षदर्शींनुसार, कारचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, आळंदीकडून वडगावकडे जाणारी ही कार अत्यंत वेगात होती. समोर आलेल्या वाहनांना चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाने कट मारला, परंतु वेगावर नियंत्रण नसल्याने गाडी रस्त्यालगतच्या दुकानात शिरली. गाडी अंगावर येत असल्याचे पाहून दुकानासमोर उभे असलेले पाच ते सहा नागरिक सुदैवाने बाजूला झाले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
यापूर्वी पुण्यात अशाच प्रकारे भरधाव कारने विद्यार्थ्यांना उडविल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आळंदीतील या घटनेनेही स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते निसार सय्यद म्हणाले, “मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई आणि ड्रिंक अँड ड्राइव्हचे गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. पोलिसांनी तातडीने योग्य पावले उचलावीत.”
आळंदी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.