आळंदी वार्ता : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभर पोहोचविण्यासाठी आळंदी येथे ४५० एकर जागेत भव्य संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.
या सोहळ्यास ह.भ.प. शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ज्ञानपीठ उभारण्यासाठी ७०१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचे विचार जगभर पोहोचतील.” त्यांनी इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह ३९ गावांतील पाणी शुद्धीकरणाचा विकास आराखडा केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे सांगितले. “लवकरच हा आराखडा मंजूर होईल आणि इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पूजनीय होईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
ह.भ.प. शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांच्या भागवत धर्म प्रचाराच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्म पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले. “परकीय आक्रमणाच्या काळात वारकरी संप्रदाय आणि संतांनी भागवत धर्म जिवंत ठेवला. संतांनी जात, पंथ, धर्मविरहित समाज निर्माण केला. ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढविला,” असे ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी अध्यात्मिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही, तर मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. संतांच्या अध्यात्मिक विचारांमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. ज्ञानेश्वरीमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.” त्यांनी वारीच्या स्वयंशिस्तीचे कौतुक करत गीतेतील विचार ज्ञानेश्वरीद्वारे मराठीत रुजविण्याच्या संतांच्या कार्याचा गौरव केला.
सोहळ्यात ‘नमो ज्ञानेश्वरा’ या ग्रंथाचे आणि त्याच्या ऑडिओ बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच, अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा सत्कार आणि मुख्यमंत्र्यांचा ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. योगी निरंजननाथ यांनी प्रस्ताविकात सोहळ्याची माहिती दिली.