आळंदी: आळंदी नगरपरिषदेने आपल्या चार शाळांमधील २१५० विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आदर्श विद्यार्थी पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी या उपक्रमाचा ठराव केला आहे.
आदर्श विद्यार्थी पुरस्कार –
प्रत्येक शाळेतून पहिली ते पाचवी आणि सहावी ते सातवी गटातून प्रत्येकी एक, असे एकूण आठ विद्यार्थी निवडले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना २५०० रुपये रोख, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल. निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांची उपस्थिती, परीक्षेतील गुण, चारित्र्य, उपक्रमातील सहभाग आणि खेळातील प्राविण्य यांचा विचार होईल. मुख्याध्यापकांमार्फत मूल्यमापन होणार असून, कोणताही भेदभाव न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुरस्कार वितरण समारंभ २ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता फ्रुटवाले धर्मशाळेत होणार आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार-
प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाची आदर्श शिक्षक म्हणून निवड होईल. आदर्श शिक्षकांना १०,००० रुपये रोख, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन ५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिनी सन्मानित केले जाईल. शिक्षकांची उपस्थिती, उपक्रम, शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर यांच्या आधारे मूल्यमापन होईल.
मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, “हा उपक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणा आणि शैक्षणिक गुणवत्तेला चालना देईल.” आळंदी नगरपरिषदेचा हा पुढाकार स्थानिक शाळांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरणार आहे.