Sunday

03-08-2025 Vol 19

आळंदीत मराठा वधू-वर मेळाव्याचा उच्चांक; 3500 पालकांची उपस्थिती

आळंदी  – पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ज्ञानसागर मंगल कार्यालयात सकल मराठा समाज आणि मराठा सोयरीक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 98 वा मोफत वधू-वर परिचय मेळावा रविवारी उत्साहात पार पडला. या मेळाव्याला 3500 हून अधिक पालकांनी हजेरी लावली, ज्यामुळे हा आळंदीतील सर्वात मोठा मेळावा ठरला. आतापर्यंत या संस्थेने 4500 हून अधिक लग्ने यशस्वीपणे जुळवली आहेत, ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी यावेळी अधोरेखित झाली.

मेळाव्याची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान शेठ पोखरकर, धनंजय पठारे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, तालुकाप्रमुख निलेश पवार, प्रकाश कुऱ्हाडे, श्रीधर कुऱ्हाडे, शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, सेवानिवृत्त वन अधिकारी प्रभाकर कड पाटील, मराठा सोयरीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुटे, संस्थेचे मार्गदर्शक नानासाहेब दानवे, कविता बोंबले, मनीषा सांडभोर, प्रकाश कुऱ्हाडे, विलास घुंडरे, ज्ञानेश्वर मोरे, माऊली घोडके महाराज, मंगल राक्षे, मनीषा थोरवे, योगेश पगडे, राहुल थोरवे, समीर जैद, नितीन ननवरे, दत्तात्रय खांडेभराड, रोहिदास कदम, ज्ञानेश्वर घुंडरे, कैलास घेनंद, रोहिदास कदम, विनायक महामुनी, डॉ.विकास थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यात 282 जणांनी नावनोंदणी केली, त्यापैकी 235 मुलं आणि 47 मुली होत्या. सातारा, सांगली, धाराशिव, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, बीड, मुंबई आदी जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने वधू-वर आणि पालकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, अनेक मुला-मुलींनी स्वत: स्टेजवर येऊन आपला परिचय दिला, ज्यामुळे मेळाव्याला एक वेगळीच रंगत आली.

अनिता चव्हाण यांचा भावनिक अनुभव –

मागील वर्षी याच मेळाव्यात सहभागी झालेल्या अनिता चव्हाण यांनी आपला भावनिक अनुभव उपस्थितांसमोर मांडला. त्या म्हणाल्या, “गेल्या वर्षी मी याच ज्ञानसागर मंगल कार्यालयात मराठा सोयरीक संस्थेच्या मेळाव्यासाठी आले होते. शेजारी बसलेल्या ताईंशी गप्पा झाल्या, एकमेकांच्या स्थळाची माहिती घेतली. सर्व गोष्टी जुळल्या आणि अवघ्या 12 दिवसांत माझ्या मुलीचे लग्न त्यांच्या मुलाशी लग्न जमले आणि पार पडले. आज त्यांचा संसार सुखाने सुरू आहे.”

संस्थेची उल्लेखनीय कामगिरी –
मराठा सोयरीक संस्थेने गेल्या काही वर्षांत 4500 हून अधिक लग्ने जुळवली आहेत. मोफत वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांतील कुटुंबांना एकत्र आणण्याचे आणि योग्य जोडीदार शोधण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करत आहे. यावेळी अनेक पालकांनी हा मेळावा आळंदीतील सर्वात मोठा आणि यशस्वी मेळावा असल्याचे मत व्यक्त केले.

पुढील मेळाव्यांसाठी आवाहन –
मराठा सोयरीक संस्थेने इतर ठिकाणी असे मोफत वधू-वर मेळावे आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. जे पालक या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी अधिक माहितीसाठी 7447785910 किंवा 8983446442 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण –
हा मेळावा केवळ लग्न जुळवण्यापुरता मर्यादित नसून, समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक यशस्वी प्रयत्न आहे. आळंदीतील या मेळाव्याने पुन्हा एकदा मराठा सोयरीक संस्थेच्या कार्याची आणि समाजाप्रती त्यांच्या समर्पणाची चुणूक दाखवली.

alandivarta