Sunday

03-08-2025 Vol 19

आळंदीत उभारणार जागतिक तत्त्वज्ञान विद्यापीठ: संत ज्ञानेश्वरांचे विचार जगभर पोहोचविण्याचा संकल्प

आळंदी, : संत ज्ञानेश्वर महाराजांचे वैश्विक तत्त्वज्ञान जगभरातील विद्यापीठांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आळंदी देवस्थानच्या साडेचारशे एकर जागेत जागतिक दर्जाचे तत्त्वज्ञान विद्यापीठ उभारले जाईल. यामुळे जगभरातील अभ्यासू विद्यार्थ्यांना माउलींचे विचार शिकण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती आळंदी देवस्थानचे नवनियुक्त विश्वस्त ह. भ. प. चैतन्य महाराज कबीर लोंढे यांनी दिली.

आळंदी ग्रामस्थांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी ह. भ. प. चैतन्य महाराज बोलत होते. यावेळी अॅड. राजेंद्र उमाप, ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, डॉ. भावार्थ देखणे आणि अॅड. रोहिणी पवार यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

चैतन्य महाराज म्हणाले, “सॉक्रेटिसचे तत्त्वज्ञान जगभरातील विद्यापीठांमध्ये शिकवले जाते, परंतु त्यापेक्षाही उच्च तत्त्वज्ञान असलेले संत ज्ञानेश्वरांचे विचार अद्याप तिथे पोहोचले नाहीत. हे आपले अपयश आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून माउलींचे विचार जगभर पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे.”

कार्यक्रमाला पालखी सोहळा मालक आरफळकर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, चंदिले महाराज, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, रोहिदास तापकीर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले पाटील, भाजप नेते संजय घुंडरे, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, राम गावडे, नंदकुमार कुऱ्हाडे, अॅड. विष्णू तापकीर, राहुल चिताळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आळंदीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला नवी दिशा या विद्यापीठाच्या उभारणीमुळे आळंदीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला जागतिक स्तरावर नवे स्थान प्राप्त होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

alandivarta