आळंदी: आळंदी शहरात सध्या पाणीपुरवठ्यासोबतच कचरा संकलनाच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी घंटागाडी चार ते आठ दिवस उशिराने येत असल्याने घरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सोशल मीडियावर नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मरकळ रोड परिसरातील संकेत वाघमारे यांनी सांगितले, “आमच्या गल्लीत आठवडाभर घंटागाडी येत नाही. विचारणा केल्यास ड्रायव्हर नाही, असे उत्तर मिळते.” तसेच, तुषार नेटके यांनीही तक्रार केली की, “पूर्वी रोज येणारी घंटागाडी आता चार दिवसांपासून दिसत नाही. लोक किती दिवस कचरा घरात ठेवणार?
“याशिवाय, भागीरथी नाला परिसरात कचरा जमा होणे आणि त्याला आग लावण्याच्या घटनांमुळेही नागरिकांमध्ये असंतोष आहे. स्थानिक रहिवासी डी. डी. भोसले यांनी याबाबत म्हणाले, “भागीरथी नाल्यावर डीपीजवळ कचरा पेटवून देण्याची घटना घडली, याला नगर परिषद आणि संबंधित कर्मचारी जबाबदार आहेत. मी वारंवार कचरा उचलण्याची आणि नाला स्वच्छ करण्याची मागणी केली, पण कोणीही लक्ष दिले नाही. वेळीच कचरा उचलला असता तर ही आग लागली नसती.”
नागरिकांच्या या तक्रारींमुळे आळंदी नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. कचरा संकलनाच्या अनियमिततेमुळे शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत असून, याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नगर परिषद प्रशासन या समस्येकडे कधी गांभीर्याने पाहणार, हा प्रश्न आता आळंदीकरांना सतावत आहे.