होय होय वारकरी । पाहें पाहें रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें । फळ अवघेंचि येणें ॥ध्रु.॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥
अर्थ – चिंतनसाठी निवडलेला हा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगामधून आपणास असे दिसते की, संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाला वारकरी होण्यासाठी, या ठिकाणी प्रबोधन, आग्रह करतात. ही वारीची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे आई-वडील देखील पंढरपूरच्या वारीला जात होती. त्यानंतर संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांनी देखील या वारीचे महत्त्व वाढविलेले आहे. त्यानंतर हैबत बाबा यांनीही पंढरपूरला पालखीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून नेण्याची प्रथा सुरू केलेली आहे. वारी हा सांस्कृतिक भारतीयांचा महोत्सव आहे.
वारकरी म्हणजे आपल्या सर्व विकारांवर वार, मात करणारा असतो. त्याचे जीवन विकार रहित झालेली असते. वारकरी संयमी असतो. तो धैर्यवान असतो. तो नीतिमान असतो. तो प्रामाणिक असतो. त्याच्या ठिकाणी बंधुभाव असतो. तो आळंदी-पंढरपूर, त्रंबकेश्वर अशा तीर्थांची वारी करतो. त्याचे जीवन विठ्ठलमय झालेली असते. पांडुरंगमय झालेली असते. तो दुसऱ्यांना मदत करण्यासाठी, परोपकारासाठी नेहमी तत्पर असतो. वारीच्या वाटाने तो चालत असताना ऊन, वारा, पाऊस यापैकी कशाचीही तमा न बाळगता विठ्ठलाचे भजन करीत. अभंग म्हणत हरिपाठ म्हणत. कीर्तन करीत, नामस्मरण करीत, पायी पंढरपुरा पर्यंत चालत राहतो राहतो. तो भगवंताचे नामस्मरण करतो त्यामुळे त्याच्या चित्तामध्ये सदा, सर्वकाळ समाधान असते. वार, तिथी दिवस, महिना तो विसरून जातो, नेहमी आनंदी असतो. म्हणून पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने तुकाराम महाराज वारकरी व्हायला सांगतात.
वारकरी झाल्यानंतर मग त्याने पंढरी पाहावी. पंढरपूरच्या वाटेने विठ्ठलाचे नाम घेऊन जर आपण पाऊल टाकायला लागलो तर प्रत्येक पावलाप्रमाणे आपल्याला यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. पंढरीचे वारकरी हे मोक्षाचे अधिकारी असतात. चंद्रभागेचे स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं की, इथे कथा कीर्तन ऐकले की आपल्या चित्ताला सदा समाधान मिळते. चंद्रभागा नुसती डोळ्यांनी पाहिली तरी सगळ्या तीर्थांचे दर्शन आपल्याला होते. पंढरी पाहिल्याबरोबर आपली सर्व पापे दूर होतात. वारकरी होऊन पंढरपूरच्या वाटेने आपण गेल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची दुसरी साधने करावी लागत नाहीत. मात्र फळ सर्व मिळते. वारकरी झाल्यानंतर पंढरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि विशेष म्हणजे आपल्या मनातील जो अहंकार असतो. तो अहंकार कायमचा निघून जातो किंवा गळून पडतो किंवा नाहीसा होतो.माणसाचा अभिमान गेला की माणूस देवच होत असतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात की ही वारी करत असताना, अभंग म्हणत असताना, राम कृष्ण हरी मंत्राचा जप करत असताना, पायी चालत असताना हा विठ्ठल आमच्या डोळ्यात बसलेला आहे. त्यामुळे विठ्ठल जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे असे आमची अनुभूती होते. विठ्ठलाच्या स्वरूपाशी त्याच्या मूर्ती शिवाय, त्याच्या रूपाशिवाय आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दुसरे काहीच दिसत नाही. विठ्ठलाचे मूख पाहिल्यामुळे डोळ्याला समाधान मिळते. सर्व विश्वच आम्हाला विठ्ठलमय वाटायला लागते. कोणत्याही प्रकारचा भेदभाव काळा – गोरा, उच्च – ठेंगू, लहान-मोठा, गरीब – श्रीमंत, कनिष्ठ-वरिष्ठ असा रहात नाही. आळंदी- पंढरी पालखी सोहळ्यामध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच वारकरी होऊन आळंदी पंढरीची वारी केली पाहिजे. तेव्हाच मनाला सुख शांती समाधान मिळेल. याप्रमाणे वारकरी, त्याचे श्रेष्ठत्व, त्याची समता, त्याची आचारसरणी, त्याची विचारसरणी, त्याची ध्येयधोरण, त्याचे जीवन व कार्य यांचा आढावा या अभंगातून घेण्यात आलेला आहे. हे वास्तवातील पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्यांची चित्र रेखाटलेली आहे. यामधून समाजापुढे एक आदर्श वारकरी दिसतो.
लेखक : श्री.ह.भ.प.प्रा.डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे.