Friday

01-08-2025 Vol 19

पंढरीच्या वारीचे महत्त्व आणि भक्तीचा मार्ग

होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥

हाचि माझा नेमधर्म । मुखी विठोबाचे नाम ॥२॥

हेचि माझी उपासना । लागे संतांच्या चरणा ॥३॥

तुका म्हणे देवा । हीच माझी भोळी सेवा ॥४॥ 

अर्थ – चिंतनसाठी निवडलेला हा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगामधून आपणास असे दिसते की तुकाराम महाराज यांच्या जीवनाला पंढरीच्या वारीचा वेध लागलेला होता. ती वारी त्यांच्या घरी होती. त्यांच्या पूर्वजांकडून, वडिलांकडून ही वारी त्यांना त्यांच्या घरामध्ये वंशपरंपरेने प्राप्त झालेली होती. पंढरीचे वारकरी हे मोक्षाचे अधिकारी असतात हे त्यांना माहिती होते. म्हणून या पंढरीच्या वारीसाठी मी भिकारी होऊन पंढरीची वारी करणार आहे. वारी म्हणजे एखाद्या ठिकाणाला, एखाद्या तीर्थाला, एखाद्या देवतेला, एखाद्या तीर्थस्थळाला पुन्हा पुन्हा भेट देणे म्हणजे वारी होय.

आळंदी – पंढरपूर वारी वारकरी करतात. त्यामुळे जन्म मरणाची – वारी संपते. संत तुकाराम महाराज म्हणतात, की मी वारीसाठी भिकारी वृत्ती, भिकारी पण सुद्धा स्वीकारेल. त्यासाठी मी धनसंपदा या सर्वांचा त्याग करेल. मी वारकरी होण्यासाठी भिकारी सुद्धा होईल. भिकारी वृत्ती, भिकारी पण मी त्यांच्याकडून मागून घेईल. आणि मी मग पंढरपूरचा वारकरी होईल. हाच माझा नेम आणि धर्म देखील असेल की भगवंताचे नामस्मरण करणे, चिंतन करणे. हे महाराजांचे वाचिक तप होते. मी काही झाले तरी माझा हा नियम, धर्म सोडणार नाही. मी रात्रंदिवस भगवंताचे विठ्ठलाचे नाम चिंतन करीत राहणार आहे. `विठ्ठल विठ्ठल चित्ती | गोड लागे गाता गीती ||१|| विठ्ठलाचे गायन, भजन केलं की माझ्या चित्ताला गोडपणा लागतो. समाधान मिळते, मला आनंद मिळते. म्हणून मी मुखाने विठ्ठलाचे नाम – चिंतन सदोदित करीत असतो.

विठ्ठल माझा माय -बाप, बंधू, सखा, चुलता, जिवलग सर्व काही आहे. सर्व काही आहे. विठ्ठलाचे भजन, कीर्तन, चिंतन करणे सर्व माझे काही आहे. या शिवाय दुसरा विचारच माझ्या मनाला शिवू शकत नाही. तसेच हीच माझी उपासना आहे की संतांच्या चरणाला लागणे. संत चरण सेवा करणे. हे माझे कायिक तप आहे. मी संतांच्या चरणाशिवाय, त्यांच्या ज्ञानाशिवाय कोणतीही दुसरी साधना करणार नाही. संतांच्या पायावर माझा विश्वास आहे. मी सर्व भावे त्यांचा दास झालेलो आहे. संतांच्या चरणामुळे वासनेचे बीज जळून जात असते. ते सर्व जीवांचे हित करीत असतात. म्हणून माझा पूर्णपणे संतांच्या पायावर विश्वास आहे. संत म्हणजे ज्यांची वृत्ती शांत झालेली आहे. ज्यांचे काम क्रोधादी विकार जळून गेलेले आहेत. समाधानी झालेली आहे, निर्विकार झालेली आहे. त्यांचे जीवन हे देवरूप झालेले आहे. त्यांचे दोष-गुण देखील हरपलेले आहेत. म्हणून मी संत चरण पुढे नम्र होऊन. त्यांची सेवा करणार आहे.

तुकाराम महाराज म्हणतात की ही माझी सेवा भोळी, भाबडी, साधी, सरळ आहे. म्हणून ते पंढरीस पांडुरंग परमात्म्याला विनंती करतात की देवा? माझी ही सेवा तुझ्या नियमात, धर्मात बसेल की नाही मला माहिती नाही? परंतु ही माझी सेवा भोळी असून देवा तू काय कर सरती करून घे, पवित्र, गोड, करून घे. मान्य करून घे. आता मी भिकारी होऊन तुझी वारी करणार आहे. तुझी वारी पवित्र होण्यासाठी, मी वारकरी होऊन, वारीची मागणी तुझ्याकडे करीत आहे. म्हणून मी भिकारी होणार आहे. भिकारी होण्यात भिकारी वृत्ती धारण करण्यात तुझ्या वारीसाठी मला कोणतीही प्रकारची लाज वाटत नाही. कमीपणा वाटत नाही. मला वारीच करायला मिळावी ही माझी धारणा आहे. त्यासाठी मी हे भिकारीपण घेण्यास तयार आहे.

यातून वारीचे महत्व, विठ्ठलाच्या नाम चिंतनाचे महत्त्व, नित्यनेम, उपासना यांचे महत्त्व सांगत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांना वारी, बरोबर पंढरपूरकडे जाणारांना महाराजांनी हा उपदेश केलेला आहे. दुसरे काहीही आपण वारीसाठी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जात नाहीत. कोणताही आर्थिक लाभ व्हावा म्हणून मी ही वारी करत नाही. मी फक्त आणि फक्त पांडुरंगासाठीच पंढरीची वारी करीत आहे.

लेखक : श्री.ह.भ.प.प्रा.डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे.

alandivarta