आळंदी वार्ता: ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 16 जून रोजी होणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आज (दि. 14) रोजी आयोजित सभेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांचा पाया शिक्षकांमुळेच घडतो, असे सांगत त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. टप्पा वाढ अनुदान, अंशतः अनुदानित शाळा, जुन्या पेन्शन योजनेचा लाभ आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती यासंदर्भातील प्रश्नांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
आमदार आसगावकर यांनी शिक्षक आमदार संघातील सर्व शाळांना संगणक आणि कलर प्रिंटर देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्यक्त केला. शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वतीने रामदास वहिले यांनी शिक्षकांच्या व्यथा मांडल्या.संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी प्रास्ताविकात शिक्षण क्षेत्रातील अडचणी सादर केल्या.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, प्राचार्य एस. जी. मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सभेत शाळेच्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण असल्याचे सांगण्यात आले.