आळंदी वार्ता – स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून आळंदी नगरपरिषद आणि कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ महिला बचत गट सदस्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज, ११ जून २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.
या कार्यशाळेत महिलांना उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये केंद्रीकृत सुका कचरा प्रक्रिया केंद्र चालवणे, पुनर्वापरयोग्य वस्तूंचे संकलन, दुरुस्ती आणि विक्री, कचरा व्यवस्थापन, कपड्यांच्या कचऱ्याचा पुनर्वापर, बांधकाम राडारोड्यावर प्रक्रिया, खतनिर्मिती (कंपोस्टिंग आणि बायोगॅस), फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्ती बनवणे तसेच जुन्या कपड्यांपासून पॉकेट्स, पर्स आणि पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय, व्यवसाय मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्धतेबाबतही माहिती देण्यात आली.
कार्यशाळेत मुख्याधिकारी माधव खांडेकर, कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनच्या पायल कापरे आणि तुषार जोशी, सा. प्रकल्प अधिकारी वैशाली पाटील, शहर समन्वयक शशांक कदम यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अर्जुन घोडे (समुदाय संघटक), सुवर्णा काळे (अध्यक्ष, शहर स्तर संघ), सोनाली रत्नपारखी यांनी विशेष परिश्रम घेतले.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली. मुख्याधिकारी खांडेकर यांनी महिलांना नव्या संधींचा लाभ घेण्याचे आणि पर्यावरणपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.