Wednesday

30-07-2025 Vol 19

प्रपंच, परमार्थ आणि लोकनिंदा : संत तुकाराम महाराजांचा समाजाच्या दुहेरी मानसिकतेवर अचूक प्रहार

ऐसा हा लौकिक कदा राखवेना | पतितपावना देवराया ||१|| संसार करितां म्हणती हा दोषी | टाकीतां आळसी पोटपोसा ||2|| आचार करितां म्हणती हा पसारा | न करितां नरा निंदिताती ||३|| सतसंग करितां म्हणती हा उपदेशी | येर अभाग्यासी ज्ञान नाहीं ||४|| धन नाहीं त्यासी ठायीचा करंटा | समर्थासि ताठा करिताती ||५|| ती बहु बोलो जातां म्हणती हा वाचाळ | न बोलतां सकळ म्हणती गर्वी ||६|| भेटिसी नवजातां म्हणती हा निष्ठार | येतां जातां घर बुडविले ||७|| लग्न करुं जातां म्हणती हा मातला | न करितां झाला नपुंसक ||८|| निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ | पातकाचें मूळ पोरवडा ||९|| लोक जैसा ओक धरितां धरवेना | अभक्ता जिरे ना संतसंग ||१०|| तुका म्हणे आतां आइका वचन | त्याजूनियां जन भक्ती करा ||११||

अर्थ – भाव चिंतनसाठी निवडलेला अभंग हा महाराष्ट्र भूषण, महान भागवत भक्त, विश्ववंदनीय, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अतिशय उत्कृष्टपणे समाजाचे मानसशास्त्र सांगतात. समाज मानसशास्त्राचा अभ्यास संत तुकाराम महाराजांनी अतिशय छान पद्धतीने केलेला होता. भगवंताशी संवाद साधत असताना म्हणतात. समाजाचा हा लौकिक काही केले तरी आपल्याला राखता येत नाही. कसंही वागलं तरी लोक आपल्याला नावे ठेवतातच.

हे पतीत पावन करणाऱ्या देवराया मी, तुला सांगत आहे. आपण जर मनापासून संसार करायला लागलो तर लोक आपल्याला संसारिक म्हणून चिडवितात. प्रपंचाकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर लोक आपल्याला आळशी आणि पोट भरू समजतात. आपण जर देवधर्म करायला लागलो तर लोक आपल्याला म्हणतात काय पसारा मांडला आणि नाही परमार्थ केला तर लोक आपल्याला नाव ठेवतात, निंदा करतात पण सत्संग करायला लागलो तर लोक आपल्याला उपदेश म्हणतात. आणि नाही केला तर लोक आपल्याला ज्ञान नाही आपण अभागी आहोत असे म्हणतात.

आपल्याकडे पुरेसे धन नसेल तर लोक आपल्याला करंट, दरिद्री म्हणतात. जे श्रीमंत असतील त्यांना गर्विष्ठ, अभिमानी असे म्हणतात. जास्त बोलू लागलो तर लोक आपल्याला वाचाळ म्हणतात, मूर्ख म्हणतात. कमी बोलू लागलो तर लोक आपल्याला गर्विष्ठ म्हणतात. नातलगाला भेटण्यास जास्त वेळा गेलो नाही तर लोक आपल्याला निष्ठूर समजतात. पाहुण्यांकडे आपण सारखे जाऊ लागलो तर लोक आपल्याला म्हणतात त्यांनी घर बुडवली आहे.

लग्न करू लागला तो विचार करू लागला की त्याला मातला असे म्हणतात. नाही केल तर त्याला नपुंसक म्हणायलाही घाबरत नाहीत. ज्याला मुलं नाहीत त्याला निपुत्रिक व चांडाळ म्हणतात. ज्याला जास्त मुलं आहेत त्याला पापी म्हणतात. हा लौकिक आपल्याला संभाळता येत नाही आणि अभक्त लोकाला सत्संग पचत नाही, आवडत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अशा समाजातील लोकांचा विचार न करता, त्यांचा त्याग करून आपण भक्ती केली पाहिजे. सत्कर्म केलं पाहिजे, संत संग धरला पाहिजे.

आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. त्यावेळी लोक काय आपल्याला म्हणतील याचा विचार करू नये. यावरून संत तुकाराम महाराजांचा समाज व्यवस्थेचा, समाज मनाचा, समाज मानसशास्त्राचा किती दांडगा अभ्यास होता हे आपल्या सहज लक्षात येतं. त्यांच्या इतका संसार, प्रपंच व व्यवहार कोणालाही कळत नव्हता यावरून असे आपणास दिसून येते आणि आपण त्यांच्या विचाराच्या ठिकाणी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत.

लेखक : श्री.ह.भ.प.प्रा.डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ, (वारकरी संप्रदाय भूषण), शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे.

alandivarta