Friday

01-08-2025 Vol 19

श्रीक्षेत्र गोकुळधाम संस्थानचे लोकार्पण, शिवलिंग स्थापना; महंतपदी ह.भ.प. बबनराव महाराज खेडकर यांची नियुक्ती

चिंचोशी (पुणे): माऊली वैष्णव वारकरी विकास संस्थेच्या (रजि. नं. महा/१३०/२०१०/पुणे) संचलनाखाली चिंचोशी (ता. राजगुरूनगर, जि. पुणे) येथील गोकुळनगर परिसरात नव्याने स्थापित श्रीक्षेत्र गोकुळधाम संस्थानाचे लोकार्पण, शिवलिंग स्थापना, कलशारोहण आणि महंत नियुक्तीचा भव्य सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याने परिसरात आध्यात्मिक उत्साह निर्माण झाला असून, वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेला नवे बळ मिळाले आहे.

लोकार्पण सोहळा भगवान गडाचे महंत ह.भ.प. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी संस्थानच्या महंतपदी ह.भ.प. बबनराव महाराज खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. योगी निरंजननाथ, ह.भ.प. पृथ्वीराज महाराज जाधव, ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, ह.भ.प. आबासाहेब महाराज गोडसे, ह.भ.प. बाळासाहेब महाराज शेवाळे, ह.भ.प. प्रा. पांडुरंग महाराज मिसाळ, ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील, ह.भ.प. हरिदास महाराज पालवे शास्त्री यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळी, संस्थानचे पदाधिकारी, चिंचोशी गावातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते.

ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे (अध्यापक, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था) यांच्या हस्ते शिवलिंग स्थापना आणि कलशारोहण पार पडले. यानंतर हरिकीर्तन सेवेने कार्यक्रमाला आध्यात्मिक रंग चढला. राजगुरूनगर तालुक्याचे आमदार बाबाजी काळे आणि खासदार निलेश लंके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सोहळ्याला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

श्रीक्षेत्र गोकुळधाम संस्थानाने पुढील काळात आध्यात्मिक, वारकरी आणि शास्त्रीय संगीत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, भोजन आणि शिक्षणाच्या सर्व सुविधा पुरवण्याचा निर्णय संस्थानाने घेतला आहे. याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानाचे विश्वस्तांनी केली आहे. हा सोहळा आनंदमयी वातावरणात पार पडला. श्रीक्षेत्र गोकुळधाम संस्थान भविष्यात वारकरी संप्रदाय आणि आध्यात्मिक शिक्षणाचे मोठे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

alandivarta