Wednesday

30-07-2025 Vol 19

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईचे २४ तास दर्शन

पंढरपूर: आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर २७ जूनपासून २४ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. तसेच, बहुप्रलंबित टोकन दर्शन प्रणालीची पहिली चाचणी १५ जून रोजी होणार असून, यातून मिळालेल्या अनुभवावर आधारित सुधारणा करून ही सुविधा सुरू ठेवली जाईल. ही सुविधा मंदिर समितीच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध असेल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आषाढी यात्रेचा मुख्य दिवस, एकादशी, ६ जुलै रोजी आहे.

श्री विठ्ठल-रखुमाई भक्तनिवास येथे झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख, अॅड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री आदी उपस्थित होते. मंदिरातील जतन-संवर्धनाची कामे अंतिम टप्प्यात असून, यात्रेपूर्वी ती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

भाविकांना सुलभ दर्शनासाठी बॅरीकेटींग, वॉटरप्रूफ मंडप, दहा पत्राशेड, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, लाईव्ह दर्शन, कुलर फॅन, मिनरल वॉटर, चहा-खिचडी वाटप, आरोग्य स्टॉल, अन्नछत्र, बँग स्कॅनर, हिरकणी कक्ष आणि नदीपात्रात चेंजिंग रूम यासारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. चंदनउटी पूजेची सांगता १३ जून रोजी होईल. औसेकर महाराजांना शनिरत्न आणि मानवसेवा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर झाला.

यात्रेदरम्यान लाखो भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने सर्व तयारी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

alandivarta