Wednesday

30-07-2025 Vol 19

पंढरपूर: विठ्ठल मंदिरात वशिल्याचे दर्शन बंद, सर्वसामान्य भाविकांना दिलासा

पंढरपूर: श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने वशिल्याने दर्शनाचा प्रकार बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोमवार (दि. ९) पासून याची अंमलबजावणी सुरू होणार असून, यामुळे सर्वसामान्य भाविकांना जलद आणि सुलभ दर्शनाची सोय होणार आहे. या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून स्वागत होत आहे.

पंढरपुरात दररोज सुमारे एक लाखाहून अधिक भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. वशिल्याच्या दर्शनामुळे दर्शन रांग रखडत असल्याने सामान्य भाविकांना ताटकळत रहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. यात मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी वशिल्याचे दर्शन दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सहअध्यक्ष, सदस्य आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही थेट दर्शन दिले जाणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. अशा वेळी हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरला आहे. मात्र, मंदिर समितीच्या सदस्यांना वशिल्याच्या दर्शनाची सवलत कायम असल्याने याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सदस्यांनाही ही सवलत बंद करण्याची मागणी केली आहे. मंदिर समितीने याबाबत ठोस पाऊल उचलावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

alandivarta