सुंदरते तें ध्यान उभे विटेवरी |
कर कटेवरी ठेवॊनिया||१||
तुळसीहार गळा कासे पितांबर |
आवडे निरंतर हेचि ध्यान ||२||
मकर कुंडले तळपती श्रवणी |
कंठी कौस्तुभमणी विराजित ||3||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख |
पाहीन श्रीमुख आवडीने ||४||
अर्थ- चिंतनासाठी निवडलेला अभंग महान भागवत भक्त, विश्ववंदनीय संत सम्राट, संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून अभंगाच्या माध्यमातून जगतगुरु तुकाराम महाराज, भगवंताचं सुंदर रूप कसे आहे. भगवंताचे मूळ स्वरूप कसे आहे. अतिशय सुंदर असणारा भगवान परमात्मा पांडुरंग विटेवर उभा आहे. या अभंगांमध्ये विठ्ठलाच्या नामाचा उल्लेख नाही. परंतु सुंदर हा शब्द विष्णुसहस्त्रनामामध्ये देवाच्या नावाबद्दल आलेला आहे. विठ्ठलाचे अतिशय मनमोहक, सुंदररूप विटेवर उभे आहे. २८ युगांपासून हा देव विटेवर उभा आहे.
विठ्ठलाने आपले हात कटावर ठेवलेले आहेत. संसाराचा हा भवसागर, मायासागर तरुण जाण्यासाठी जर तुम्ही माझ्याकडे आले तर तुमच्यासाठी या सागराचे पाणी फक्त कमरे इतकच आहे. या अभंगाच्या माध्यमातून सुचित केलेले आहे. म्हणून हा विठ्ठल आपले हात कटेवर ठेवून भक्ताच्या संरक्षणासाठी उभा आहे. पुंडलिकाच्या भक्तीमुळे आई-वडिलांच्या सेवेसाठी या ठिकाणी आलेला आहेत. विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीचे हार आहेत. आपला हा देव पिवळा पितांबर नेसलेला आहे. पवित्र्याचे, शुद्धतेचे प्रतीक आहे. पिवळा पितांबर हा सामर्थ्याचे प्रतीक असते.
तुकाराम महाराज म्हणतात, मला हेच ध्यान नेहमी मनापासून आवडते. विठ्ठलाच्या कानामध्ये मकराकार, मच्छकार कुंडले आहेत. जगातील सर्व संपन्नतेचे लक्षणे आहेत. सागर मंथनामधून निघालेला कौस्तुमणी देवाच्या गळ्यामध्ये आहे, विराजमान आहे. पहिल्या तीन कडव्यात देवाच्या रूपाचं वर्णन केलेले आहे तर शेवटच्या चरणामध्ये देवाच्या सौंदर्याबरोबर गुणांचे वर्णन केलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनातील सर्व सुख हेच आहे की, मी त्या विठ्ठलाचे रूप पुन्हा पुन्हा आवडीने पाहणार आहे. जगातील सर्व सुख या सुखापुढे अपूर्ण आहेत. खरे हेच भगवंताचे स्वरूप लक्षण आहे. शिवाय मला काहीच आवडत नाही. ही माझी धरण आहे. अभंग मंगलचरणपर आहे.
लेखक – प्राचार्य हभप पांडुरंग महाराज मिसाळ