आळंदी वार्ता: संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताई ही भावंडे बालपणी राहत असलेले ठिकाण त्यांच्या बाललीलांनी पावन झालेला आळंदीतील सिद्धबेट परिसर सध्या अस्वच्छतेच्या आणि अनागोंदीच्या विळख्यात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून या पवित्र स्थळावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून येत असून, हा परिसर मद्यपींचा अड्डा बनत असल्याची गंभीर शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ऋषीमुनींच्या तपश्चर्येचे स्थान असलेल्या सिद्धबेटला भाविक मोठ्या श्रद्धेने भेट देतात. मात्र, पर्यटक आणि काही स्थानिक नागरिक येथे प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा खुलेआम फेकत असल्याने परिसराची स्वच्छता धोक्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्याने या पवित्र भूमीत मद्यपान होत असल्याचा संशय बळावला आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती बिकट –
काही वर्षांपूर्वी केळगाव ग्रामपंचायत आणि नगरपालिकेने सिद्धबेट परिसरात स्वच्छता, वृक्षारोपण आणि संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवले होते. यामध्ये सिमेंट कोबा, पत्र्याचे शेड, बागकाम आणि कर्मचारी नियुक्ती यांचा समावेश होता. यामुळे काही काळ मद्यपींवर नियंत्रण मिळाले होते. मात्र, सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसर पुन्हा अस्वच्छतेच्या गर्तेत लोटला गेला आहे. प्रवेशद्वाराजवळील रस्ता मातीमुळे खचत असून, पावसाळ्यात चिखलामुळे भाविकांना चालणेही कठीण झाले आहे.
नागरिकांची मागणी: कडक उपाययोजना करा –
केळगाव ग्रामपंचायत आणि आळंदी नगरपरिषद प्रशासनात समन्वयाच्या अभावामुळे सिद्धबेटकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची खंत स्थानिक व्यक्त करत आहेत. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळाचा होत असलेला अपवित्र वापर थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. “सिद्धबेटसारख्या पवित्र भूमीचा अपमान थांबवला पाहिजे,” अशी भावना भाविक आणि स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.