आळंदी वार्ता : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाच्या बैलजोडी पूजनाच्या कार्यक्रमासाठी आळंदीत आलेल्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देवस्थान परिसरात कत्तलखाना होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. यासह, आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदीत आयोजित बैलजोडी पूजन कार्यक्रमात मिसाळ यांनी माऊलींचे समाधी दर्शन घेतले आणि देवस्थानच्या विश्वस्तांशी आगामी विकास आराखड्यावर चर्चा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे की, देशातील तीर्थस्थळांचे जतन व्हायला हवे. यामुळे देशभक्ती आणि आपली संस्कृती जपली जाते. अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरांप्रमाणे आळंदीचाही विकास आराखडा मंजूर होईल.”
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आळंदी शेजारी चार एकर जागेवर कत्तलखाना आरक्षित केल्याच्या प्रश्नावर मिसाळ यांनी स्पष्ट केले, “देवस्थान परिसरात असले काही होणार नाही. याबाबत तक्रार प्राप्त झाली असून, मी शंभर टक्के सांगते, येथे स्लॉटर हाऊस होऊ देणार नाही.”नदिपलिकडील (हवेली) वेश्या व्यवसायाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, “आळंदी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे अवैध धंद्यांना थारा मिळणार नाही. हे प्रकरण मी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणेन आणि दोषींवर कठोर कारवाई होईल.”
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत त्या म्हणाल्या, “याबाबत गेल्या आठवड्यात आमदार आणि अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून, लवकरच यावर निर्णय घेतला जाईल.” तसेच, येथील एसटी डेपोच्या पुनर्विकासासाठी प्रस्ताव आणल्यास त्यावर कार्यवाही करू, असेही त्यांनी नमूद केले.
आळंदीच्या विकासासाठी सर्वतोपरी पाठबळ देण्याचे आश्वासन मिसाळ यांनी यावेळी दिले.