Wednesday

30-07-2025 Vol 19

श्री ज्ञानेश्वर महाराजकृत पसायदान व अर्थ

आता विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें
तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥१॥
अर्थ – माऊली म्हणतात या विश्वाच्या कणाकणामध्ये भरून राहिलेल्या माझ्या भगवंता, माझा वाणीयज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे. या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हेच प्रसादाचे दान द्यावे.

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचे ॥२॥
अर्थ – दृष्टांचा दुष्टपणा नाहीसा होवो, त्यांचे सत्कर्म करण्यात स्वारस्य वाढो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो.

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥३॥
अर्थ – जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे, हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्म रुपी सूर्यांचा उदय होवो, इथे स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सीख व बौद्ध नव्हे तर माणुसकी हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल.

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ॥४॥
अर्थ – या विश्वामध्ये ईश्वर निष्ठ ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो. सध्या नश्वर गोष्टीवर प्रेम असणारी प्रवृत्ती वाढत आहे. धनसंपत्तीलाच सुख मानणारे लोक नको तर आत्म्यास चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास येऊन प्राणिमात्रांना भेटत जावो.

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचे गाव । बोलते जे अर्णव । पियुषांचे ॥५॥
अर्थ – ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे संत आहेत. संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत. संत जेथे राहतात ते जणू चिंतामणींचे गावच आहेत. त्यांची वाणी जणू अमृताचे समुद्र आहेत. जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही.

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥६॥
अर्थ – जो मनुष्य चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे. अंधारामध्ये सुद्धा दुसऱ्याला साथ देणारा आहे. रागीट स्वभाव नसणारा, ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे. अशा व्यक्तीला सदैव सज्जन लोकांची साथ लागते व त्यांचे सोयरेही अगदी त्यांच्यासारखेच असतात.

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिही लोकीं । भजिजो आदिपुरूखी । अखंडित ॥७॥
अर्थ – विश्वामध्ये तिन्ही लोकांतील लोक सर्व सुखी होऊन, अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहोत. तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंताकडे जाण्याची लोकांची इच्छा कमी होत जाते. तसे न होवो अशी मागणी माऊली येथे करतात.

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें। दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥८॥
अर्थ – आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे. या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष्य व्हावे. त्याच ग्रंथामध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे. तसेच ग्रंथांना गुरु माना आणि आपले जीवन सुखकारक करा.

येथ म्हणे श्री विश्वेश्वरावों । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥९॥
अर्थ – हे विश्वेश्वरा, हे जगाच्या मायबापा, तू जेव्हा म्हणशील ना की, हे दान मी तुला दिले, तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल. एक आदर्श समाज व्यवस्थेचे स्वप्न या जगात माऊलींनी आठशे वर्षांपूर्वी पाहिले होते. आपल्या सगळ्यांच्या आत्मकल्याणसाठी मागितलेली ही विश्वप्रार्थना खरोखरच खूप सुंदर, अप्रतिम अशी आहे.

लेख : प्राचार्य. डॉ. पांडुरंग मिसाळ, आळंदी (देवाची), जि. पुणे

alandivarta