आळंदी वार्ता: देहूफाटा सिग्नलसमोरील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या खड्ड्यांमुळे दुचाकी आणि छोट्या-मोठ्या वाहनांना रस्त्यावरून वाहतूक करताना कसरत करावी लागत होती, तसेच सिग्नल सुटल्यानंतरही संथ गतीमुळे वाहतूक कोंडी होत होती. या समस्येची दखल घेत वाहतूक पोलिस अरुण गर्जे यांनी स्वतः पुढाकार घेत स्किड-स्टीअर लोडर मशीनच्या साहाय्याने मुरूम टाकून काही खड्डे बुजवले.
अरुण गर्जे यांनी खड्डे बुजवण्याचे कार्य सुरू असतानाच प्रशासनानेही याची दखल घेत उर्वरित खड्डे भरण्याचे काम हाती घेतले. गर्जे यांच्या या कार्याचा व्हिडिओ एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला असून, स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक केले. खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास या उपाययोजनेचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.