Sunday

03-08-2025 Vol 19

आळंदीत महायुतीच्या घटक पक्षांकडून मुख्यमंत्र्यांच्या “त्या’ वक्तव्याचा निषेध

आळंदी वार्ता: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 28) ‘इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, शिंदे आणि पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री संवाद साधण्यात कमी पडतात.

शुक्रवारी (दि. 30) मुख्यमंत्री यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आळंदी येथे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महायुतीतील घटक पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशी वक्तव्ये भविष्यात टाळण्याचे आवाहन केले.

महाद्वार प्रांगणात निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आळंदी नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते डी.डी. भोसले पाटील, सौरभ गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल चव्हाण, विभागप्रमुख राहुल थोरवे, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे, शाखाप्रमुख रोहिदास कदम, दिनकर तांबे, शंकरराव घेनंद, माजी नगरसेवक मृदुल भोसले पाटील, विनायक महामुनी, निसार सय्यद, खेड प्रवक्ते आरिफ शेख, सायरा शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून महायुती सरकारला घटक पक्षांना समान वागणूक देण्याची अपेक्षा व्यक्त करत अशा वक्तव्यांमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढत असल्याचे सांगितले. यापुढे अशी वक्तव्ये टाळावीत, असे आवाहनही त्यांनी केले. सभेचे संयोजन सौरभ गव्हाणे, राहुल चव्हाण आणि मृदुल भोसले पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

alandivarta