आळंदी वार्ता : आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सततच्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, पाण्याने काठ सोडले आहेत. पुराचे पाणी भक्त पुंडलिक मंदिरात शिरले आहे. भक्ती सोपान पुलावर पाणी लागले आहे. या पाण्यात जलपर्णी वाहून जात आहे. नवीन स्कायवॉकवरील ये-जा थांबली आहे.
पूर पाहण्यासाठी भाविक आणि नागरिकांनी घाट आणि पुलांवर गर्दी केली. जलपर्णी जुन्या दगडी पुलाला अडकली असून, काही पाण्याबरोबर वाहून जात आहे. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मांधव खांडेकर आणि मंडलाधिकारी राजेंद्र वाघ यांनी नागरिकांना धोकादायक रस्ते टाळून पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे. अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क आहेत. सांडपाणी वाहिन्यांमधून पाणी उफाळल्याने प्रदक्षिणा मार्गावर पाणी वाहत आहे.