आळंदी वार्ता: अपरा एकादशीनिमित्त भाविक आणि लग्नांमुळे वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने आळंदीत आल्याने शुक्रवारी (दि. 23) शहरात दुपारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. काही बेशीस्त वाहनचालकांनी दोन लेन केल्याने आणि वऱ्हाडींची वाहने काही ठिकाणी रस्त्यात पार्क केल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येत होत्या. वडगाव रस्त्यावर तब्बल दोन किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शर्थीचे प्रयत्न करत पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. मात्र एक तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
आळंदीसाठी स्वतंत्र वाहतूक विकास आराखडा आवश्यक –
महराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र, मंगल कार्यालये, रहिवाशांची वाढती लोकसंख्या विचारात घेता आळंदी शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. यावर उपाययोजना आवश्यक आहेत. आळंदीसाठी स्वतंत्र वाहतूक विकास आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावनीची मागणी होत आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय बैठकांमध्ये वाहतूक कोंडीचा विषय प्राधान्याने घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
देहू फाट्यावरील विद्यूत पोल देतोय अपघाताचे निमंत्रण-
आळंदीहून पुणेकडे जाताना देहू फाटा येथे दोन विद्युत पोल रस्त्यातच उभे आहेत. या पोलमुळे वाहतूकीला मोठा अडथळा होत असून अनेकदा अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. सदर पोल हटवून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे. एखादा मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही नागरिक करत आहेत.
अपरा एकादशीनिमित्त आळंदीत भक्तीमय वातावरण –
अपरा एकादशीनिमित्त आज सकाळपासून भाविकांची आळंदीत गर्दी वाढली होती. हजारो भाविकांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. तसेच गळ्यात टाळ, मृदंग विणा, खांद्यावर पताका घेऊन भाविक वारकऱ्यांनी ढगाळ वातावरणात पावसांच्या हलक्या सरी अंगावर झेलत नगर प्रदक्षिणा केली. माऊली मंदिर गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच आळंदीत विविध धर्मशाळा, मंदिरांमध्ये कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. एकादशीनिमित्त सर्वत्र भक्तीमय वातावरण होते.
“वाहन चालकांनी डबल लाईन केलेली होती, तसेच लग्नाला आलेले नागरिक यांनी रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केली त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. तात्काळ पीएस आय, अंमलदार, वार्डन यांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळात वाहतूक सुरळीत केली. आळंदीतील वाहतूक कोंडीचा विषय वारंवार चर्चेला येत आहे, सर्व ग्रामस्थांनी मिळून लग्न मंगल कार्यालयच्या धर्मशाळेच्या पार्किंगचा विषय मार्गी लावला पाहिजे. सदरचा विषय कायमचा मार्गी लावणे आवश्यक आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे. याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही ट्रॅफिक जाम झाल्यावर नक्कीच ट्राफिक काढतो.” – सतीश नांदुरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आळंदी – दिघी वाहतूक विभाग )