आळंदी वार्ता: अपरा एकादशी निमित्ताने आज आळंदी नगरीत भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. पहाटेपासूनच पावसाच्या हलक्या सरींनी वातावरणात गारवा आणला असताना, भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा यांत तसूभरही कमतरता दिसली नाही.
सकाळी आभाळ दाटून आले असतानाही पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. स्नानानंतर इंद्रायणी मातेची आरती आणि पूजा करत भाविकांनी भक्तीमय वातावरण निर्माण केले. टाळ-मृदुंगाच्या तालावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात रंगून गेले.
ग्रामप्रदक्षिणेत ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष-
एकादशीनिमित्त आळंदी ग्राम प्रदक्षिणा करण्याची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाच्या दिंडीने ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात भाविक वारकरी ग्रामप्रदक्षिण करत होते. खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ-मृदुंग आणि मुखी हरिनामाचा गजर असा हा भक्तीमय सोहळा पावसाच्या हलक्या सरींमध्येही अविरत सुरू होता. या दिंडीने आळंदीच्या रस्त्यांवर भक्तिरस पसरवला.
संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी-
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. एकादशीच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. एकादशी असल्यामुळे भाविकांसाठी विशेष प्रसादाचे वाटपही करण्यात आले.
एकादशीनिमित्त ठिकठिकाणी हरिकीर्तन –
आळंदीतील विविध ठिकाणी हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण नगरीत भक्ती, हरिनाम आणि पावसाच्या थेंबांचा सुंदर मिलाफ दिसून येत आहे. पावसाकडे दुर्लक्ष करत भाविकांनी भक्तीची उंची गाठली आणि या पावन पर्वात सहभागी होऊन आळंदीला भक्तीमय रंगात रंगवले आहे.