आळंदी वार्ता: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याला अवघा महिना बाकी असताना, आळंदी ते पुणे पालखी मार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. १९ जून रोजी माउलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान होणार असून, रस्ते दुरुस्ती आणि इतर आनुषंगिक कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही.
देहूफाटा ते काळेवाडी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथील खड्डे आणि रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब अपघाताला निमंत्रण देत आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हे खांब दिसत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विद्युत खांबांमुळे रस्ते अरुंद झाले असून, सिग्नल बसविण्यासही अडचणी येत आहेत, परिणामी वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
काळे पेट्रोल पंप ते चहोली बुद्रुक हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या साइडपट्ट्या खचल्या असून, वाहने खड्ड्यांत पडण्याचा धोका आहे. रस्त्यावर पडलेली खडी वाहने घसरण्याचे कारण ठरत आहे. काळे कॉलनी परिसरातही खड्ड्यांमुळे वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. स्थानिक आणि वाहनचालकांनी रस्ते दुरुस्ती आणि विद्युत खांब हटविण्याची तातडीने मागणी केली आहे.
प्रशासनाचे आश्वासन, प्रत्यक्ष कामांची प्रतीक्षा-
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, “माउलींचा जन्मोत्सव सोहळा सुरू असल्याने रस्त्यांची कामे थांबविली होती. आता सोहळा संपला असून, पुढील १० दिवसांत रस्ते दुरुस्ती पूर्ण होईल. विद्युत खांब हटविण्याचे नियोजन महावितरणसोबत सुरू आहे.”
वारकऱ्यांची गैरसोय, पालिकेवर टीका-
संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले, “अरुंद रस्ते आणि खड्ड्यांमुळे वारकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे उडाले असून, साइडपट्ट्या भरण्याची गरज आहे. पालिकेचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.”पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी वारकरी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.