Wednesday

30-07-2025 Vol 19

पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्याचे पोलिसांचे आश्वासन; पुणे पोलिस, संस्थान पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक

आळंदी वार्ता: श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यापूर्वी पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे वारकऱ्यांसाठी अडथळा ठरू शकतात. विशेषतः विश्रांतवाडी मुख्य चौक आणि दिवे घाटातील रस्त्यांची कामे यंदा पालखी प्रस्थानापूर्वी पूर्ण व्हावीत, अशी मागणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने केली आहे. यावर पुणे पोलिसांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पालखीपूर्वी मार्ग मोकळे करण्याचे आश्वासन दिले आहे. 20 आणि 21 जून रोजी दोन्ही पालखी सोहळे पुण्यात मुक्कामी असणार आहेत.

बुधवारी (दि. 21 मे) पोलीस आयुक्त कार्यालयात पुणे पोलिस आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज संस्थानच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आढावा बैठक पार पडली. बैठकीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, अ‍ॅड. रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त पदाधिकारी जालिंदर मोरे, वैभव मोरे, दिलीप मोरे आदी उपस्थित होते.

बंदोबस्त आणि नियोजनावर चर्चा –
बैठकीत पालखी प्रस्थानापासून ते पुण्यातून बाहेर पडेपर्यंतच्या मार्गावरील सुरक्षा, बंदोबस्त आणि पार्किंग व्यवस्थेवर सविस्तर चर्चा झाली. गतवर्षी पालखीला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला होता. यंदा गर्दी नियंत्रणासाठी बंदोबस्त वाढवून रात्री 8:30 वाजता आरती होईल, असे नियोजन करण्याची मागणी आळंदी संस्थानच्या विश्वस्तांनी केली. पोलिसांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत मार्गावर बॅरिकेडिंग आणि बंदोबस्त वाढवण्याचे आश्वासन दिले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे समन्वय –
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालख्यांचे पुण्यात दोन मुक्काम होतात. यासोबत येणाऱ्या वारीच्या वाहनांसाठी योग्य पार्किंग व्यवस्था हवी, अशी मागणी विश्वस्तांनी केली. यासाठी दिंडी प्रमुख आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून पार्किंगसह अन्य माहिती उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

alandivarta