Sunday

03-08-2025 Vol 19

आळंदीत रविवारी भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

आळंदी वार्ता: श्री आळंदी धाम सेवा समितीच्या वतीने येत्या रविवारी, (२५ मे) रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेदश्री तपोवन, आळंदी-मोशी रोड, हवालदार वस्ती, डुडूळगांव येथे भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, संस्थापक अध्यक्ष, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, कोषाध्यक्ष श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र (न्यास) अयोध्या आणि उपाध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा यांचे शुभाशीर्वाद लाभले आहेत.

शिबिरात नागरिकांना मोफत नेत्र तपासणी, रक्तदाब तपासणी, रँडम ब्लड शुगर तपासणी, वजन तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला यासारख्या सुविधा उपलब्ध असतील. स्पर्श ऑर्थो ॲण्ड चाईल्ड केअर क्लिनिकच्या सहकार्याने डॉ. स्वप्नील सोनार (अस्थिरोग तज्ञ, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, एम.बी.बी.एस., डी. ऑर्थो, डीएनबी) अपघात, फ्रॅक्चर, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, आमवात, कंबरदुखी, हाडांचा ठिसुळपणा यासारख्या समस्यांवर उपचार आणि मार्गदर्शन करतील. तसेच, डॉ. आकाश दिघे (एम. डी. पेडियाट्रिक्स) बालरोग चिकित्सा, कुपोषण, बाल दमा, कमी वजन व उंची वाढवणे, रात्री अंथरुणात लघवी करणे आणि अनेमिया यांचे निदान व उपचार करतील.

कमलेश हॉस्पिटल, जगताप क्लिनिक, धारा हॉस्पिटल आणि मेडिकव्हर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर, जसे की डॉ. अक्षय शिंगणे (B.A.M.S.), डॉ. भुषण जगताप (D.G.M.), डॉ. सुनिल जगताप (B.H.M.S.), आणि डॉ. सुहास गायकवाड (M.B.B.S.) यांच्या सेवा उपलब्ध असतील. मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथील अमोल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकव्हर फॅमिली कार्डद्वारे विशेष लाभ मिळतील, ज्यामुळे कुटुंबांना आरोग्य सेवांचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

वेदश्री तपोवन समिती, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, स्वराज ग्रुप, जय गणेश ग्रुप आणि आळंदी-डुडूळगांव ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. नाव नोंदणीसाठी श्री. साईनाथ किशोर ताम्हाणे (सचिव, श्री आळंदी धाम सेवा समिती, मो. ९७३०२४२७१६) यांच्याशी संपर्क साधावा. राहुल ज्ञानेश्वर चव्हाण (शिवसेना आळंदी शहर प्रमुख व अध्यक्ष, श्री आळंदी धाम सेवा समिती, मो. ९१४५१०३१०३) यांनी सर्व नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

alandivarta