आळंदी वार्ता : गेल्या सात-आठ दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मावळ आणि धरणक्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. २०) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आळंदी शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वडगाव चौक, मरकळ चौक, नगरपालिका चौक, चाकण चौक आणि देहूफाटा चौक यासह विविध रस्त्यांवर पाणी साचले, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असली तरी, नदी प्रदूषणामुळे पुन्हा एकदा फेसाळलेली दिसून येत आहे. नदीकाठच्या गावांमधील मैलामिश्रित सांडपाणी आणि कारखान्यांमधून प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने जलप्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळत असून, तीर्थक्षेत्रातील पवित्र नदीची अवस्था दयनीय झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “इंद्रायणी माता स्वच्छ होऊन तिचे तीर्थ हातावर घेता यावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रदूषण रोखण्यासाठी सामूहिक कृती आवश्यक आहे,” असे मत आळंदीतील एका नागरिकाने व्यक्त केले. इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “रसायनयुक्त सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. यामुळे जलचर जीव नष्ट होत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कोणती कार्यवाही करत आहे? इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,” असे त्यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे सिद्धबेट बंधाऱ्याजवळील नदीपात्रात जलपर्णी वाहून आल्याचे दिसून येत आहे. आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर असताना नदीच्या या अवस्थेमुळे वारकरी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त होत असून, नदी स्वच्छतेसाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.