आळंदी वार्ता: श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदीत सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहादरम्यान शुक्रवारी अचानक आलेल्या वादळामुळे दुर्घटना घडली. सप्ताहाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा भाग कोसळल्याने पंढरीनाथ वारे (वय ८१) हे जखमी झाले. त्यांच्यावर सध्या पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या निर्देशानुसार, वारे यांच्या उपचारासाठी कुटुंबाला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, अशी हमी देण्यात आली आहे. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी रुग्णालयात जाऊन वारे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबाला धीर देत, “बाबांची प्रकृती लवकर बरी होईल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे आश्वासन दिले.
वारे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असले, तरी त्यांची तब्येत पूर्णपणे स्थिर होईपर्यंत वैद्यकीय देखरेख कायम ठेवली जाणार आहे. बाबांना लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना भाविकांकडून केली जात आहे.