Sunday

03-08-2025 Vol 19

आळंदीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वारकरी संप्रदायाकडून गौरव; श्री पांडुरंगाची भव्य मूर्ती प्रदान

आळंदी वार्ता: वारकरी संप्रदायातील मानाच्या पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांनी गतवर्षीच्या वारीदरम्यान पुरविलेल्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर आळंदी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी सर्व मानाच्या पालखींचे प्रमुख व विश्वस्तांनी शिंदे यांना श्री पांडुरंगाची ६ फुटाची भव्य मूर्ती प्रदान करत गौरव केला.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताई महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे प्रमुख, संत वंशज आणि ज्येष्ठ कीर्तनकारांनी शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन सादर करत विविध मागण्या मांडल्या. शिंदे यांनी तात्काळ योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले. “यंदाच्या वारीतही राज्य सरकार कोणतीही कमतरता भासू देणार नाही. सकल संतांच्या तीर्थस्थानांसाठी आणि मंदिरांसाठी आवश्यक सर्व मदत केली जाईल,” असे ते म्हणाले.

शिंदे यांनी २०२३ आणि २०२४ मध्ये मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आषाढीपूर्वी प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी आदराने सुपूर्द करण्याची घोषणा केली. गतवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्यांच्या समन्वयासाठी अक्षयमहाराज भोसले यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गतवर्षी प्रत्येक दिंडीस दिलेल्या २० हजार रुपये निधीचा वारकऱ्यांना मोठा लाभ झाल्याचा उल्लेख पालखी प्रमुखांनी केला.

सत्कार समारंभास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, आमदार विजय शिवतरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालखी प्रमुखांनी शिंदे यांच्या वारकरी संप्रदायाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे आणि सुविधांसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

alandivarta