आळंदी वार्ता – कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून अध्यात्माचा जागर करण्यात आला. देवस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या बहुरूपी भारुडाने उपस्थित हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि समस्त आळंदी ग्रामस्थांच्या वतीने पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा सहावा दिवस भावार्थ देखणे व त्यांच्या ३५ कलाकारांच्या चमूच्या सादरीकरणाने विशेष ठरला. त्यांनी वासुदेव, दिंडी, कडक लक्ष्मी, गोंधळी आदी विविध लोककला सादर करत अध्यात्म, भक्ती आणि सामाजिक प्रबोधन यांचे प्रभावी मिश्रण उपस्थितांसमोर मांडले.
भारूड हे महाराष्ट्रातील एक प्राचीन सांस्कृतिक वारसा असून, संत एकनाथांच्या काळापासून लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम राहिले आहे. त्याच परंपरेत भावार्थ देखणे आणि सहकलाकारांनी “ज्ञानोबा तुकाराम” चा जयघोष करत, विठ्ठल गीतांमधून दिंडी-पालखीचा अनुभव निर्माण केला.
कार्यक्रमात वासुदेवाच्या भूमिकेतून भारतीय संस्कृती, दानधर्माचे महत्त्व, मोरपीस टोपीचे प्रतीकात्मक अर्थ यांचे विवेचन करण्यात आले. “वासुदेव माझे नाव, दान पावलं” या गीतांमधून भाविक भावनावश झाले. तसेच, भविष्य सांगणाऱ्या जोशी, गावातील पाटील, नाना, कडक लक्ष्मी यांच्या विनोदी व वास्तवदर्शी भूमिका सादर करत हास्य आणि प्रबोधनाचा संगम साधण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी अवधूत गांधी यांच्या गीतांनी वातावरण भक्तिमय झाले. अंध व्यक्तीच्या भूमिकेत अभय नलगे यांनी भावनिक सादरीकरण करून विशेष लक्ष वेधून घेतले. या अध्यात्मिक सोहळ्यात सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
या बहुरूपी लोककलेच्या सादरीकरणातून आळंदीच्या भूमीत अध्यात्म व समाजप्रबोधनाचे प्रभावी बीजारोपण करण्यात आले.