Sunday

03-08-2025 Vol 19

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आळंदीत जल्लोष! भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला विजय

आळंदी: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर अचूक मिसाईल हल्ले करत 90 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या यशस्वी कारवाईमुळे देशभर आनंदाचं वातावरण आहे. आळंदी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या नेतृत्वाखाली या ऑपरेशनचं स्वागत करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे आभार मानण्यात आले.

22 एप्रिल रोजी पहलगाम येथील बैसारण परिसरात दहशतवाद्यांनी 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकासह 26 पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात हिंदू पुरुषांना लक्ष्य करत हत्या करण्यात आली, ज्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. पंतप्रधान मोदी यांनी “दहशतवाद्यांना पृथ्वीच्या टोकापर्यंत शोधून शिक्षा करू,” असं आश्वासन दिलं होतं.

भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत 6-7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित कश्मीरमधील (पीओके) लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या तळांना उद्ध्वस्त करत या हल्ल्याचा बदला घेतला. या विजयाचा आळंदी जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक सागर भोसले, आकाश जोशी, संकेत वाघमारे, भागवत आवटे, संतोष गावडे, वासुदेव तुर्की, प्रीतम किरवे, कृष्णा पालवे, राहुल घोलप, एकनाथ मोरे, राम पवळे, ज्ञानेश्वर बनसोडे, मंगल ताई हुंडारे, संगीता कंकाळे यांसह भाजप कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. येळवंडे म्हणाले, “मोदीजींच्या नेतृत्वात आणि लष्कराच्या शौर्याने भारताने दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आळंदीकर या विजयाचा उत्साह साजरा करत आहेत.”

alandivarta