आळंदी वार्ता: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) आळंदीत साजरा होत आहे. 3 मे रोजी या सोहळ्यास सुरुवात झाली असून 10 मेला समाप्ती आहे. सोहळ्यात दररोज ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, संत चरित्र चिंतन, प्रवचन, हरिपाठ, संगीत भजन आदी कार्यक्रम होत आहेत. दरम्यान या सोहळ्याचा एक भाग म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार (दि. 9 ) रोजी सायंकाळी 5 ते 8:30 या वेळेत आळंदीत भव्य रथोत्सव आणि इंद्रायणीच्या तीरावर अभूतपूर्व दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या भक्तीमय सोहळ्याचं मुख्य आकर्षण माऊलींचा भव्य रथोत्सव असणार आहे. ज्यामध्ये 750 मृदंग वादक आणि 2,100 टाळकऱ्यांचं सुमधुर वादन होईल. इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर दोन्ही काठांवर आकर्षक विद्युत रोषणाई आणि नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. याशिवाय, 151 ब्रह्मवृंद मंत्रोच्चार करणार आहेत. यावेळी 7,500 भगिनी इंद्रायणीच्या जलात प्रज्वलित दिवे अर्पण करणार आहेत.