Saturday

02-08-2025 Vol 19

संत ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव: हरिनाम सप्ताहातील पाचवा दिवस कसा होता?

आळंदी वार्ता: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी ग्रामस्थांच्यावतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने पाचव्या दिवशी (बुधवार दि. 7 मे) भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले. सकाळी 6 ते 10 या वेळेत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झाले. सकाळी 10 ते 12 या कीर्तन सत्रात श्री संत नामदेव महाराजांचे 17वे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी श्री संत जनाबाईंच्या “संतांचा संग तो नव्हे भलतैसा” या अभंगावर सुमधुर निरूपण केलं. त्यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.

दुपारच्या 1:30 ते 3:30 च्या सत्रात ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं चिंतन करताना श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या जीवनातील प्रसंगांचा सुंदर उलगडा केला. “संतांचं चरित्र आनंदी जीवनाचं सार आहे,” असं सांगत त्यांनी उपस्थितांना भक्तीच्या सागरात न्हाऊ घातलं. भाविकांची प्रचंड गर्दी आणि त्यांचा उत्साह यामुळे आळंदी भक्तीच्या रंगात रंगली.

सायंकाळी 4 ते 5 वाजता ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव यांनी श्री ज्ञानेश्वरीवरील प्रवचनातून माऊलींच्या तत्त्वज्ञानाचा गहन अर्थ उलगडला. 5 ते 6 वाजता तब्बल अडीच हजार भाविकांनी सामुदायिक हरिपाठात सहभाग घेत हरिनामात तल्लीन झाले. सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विश्वस्त उखळीकर फड परंपरेतील ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांच्या कीर्तनाने भाविकांना मंत्रमुग्ध केलं. रात्री साडे आठ ते 10 वेळेत विठ्ठलदास महाराज, गोविंदपुरम तामिळनाडू यांच्या संगीत भजनाचा हजारो भाविकांनी आनंद घेतला.

आजच्या दिवशी सुमारे 45,000 भाविकांनी माऊलींच्या प्रसादाचा लाभ घेतला. श्री संत मोरया गोसावी देवस्थान, चिंचवडचे अध्यक्ष मंदार महाराज देव यांनी या उत्सवाला भेट देत उपस्थिती दर्शवली. त्यांचा संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, डॉ. भावार्थ देखणे, ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर आणि पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

alandivarta