आळंदी वार्ता : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्ताने आळंदी येथे आयोजित भव्य सोहळ्यासाठी राज्यभरातून बहुसंख्य वारकरी आणि भाविक दाखल होत आहेत. या महोत्सवाला येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी आळंदी नगरपरिषदेने विशेष व्यवस्था केली आहे. यामध्ये धर्मशाळांमध्ये राहणाऱ्या वारकऱ्यांसाठी पाण्याची कमतरता भासू नये यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची महत्त्वपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
आळंदी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी यासंदर्भात जाहीर आवाहन जारी केले आहे. त्यांनी सांगितले की, वारकऱ्यांना पाण्याची आवश्यकता भासल्यास तात्काळ आळंदी नगरपरिषदेशी संपर्क साधावा. यासाठी शशांक कदम यांच्याशी 9284454530 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही व्यवस्था वारकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय महोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा 750 वा जन्म ऊत्सव 3 मे 2025 पासून सुरू झाला असून, तो 10 मे 2025 पर्यंत चालणार आहे. या कालावधीत आळंदी शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनावर आधारित चरित्र चिंतन, कीर्तन, प्रवचन, भक्ती संगीत, श्री ज्ञानेश्वरी पारायण यांसह आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच, वारकऱ्यांसाठी मोफत भोजन, निवास आणि वैद्यकीय सुविधांचाही समावेश आहे.
आळंदी नगरपरिषदेने यापूर्वीच स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही पावले उचलली आहेत. पाणीपुरवठ्याची ही विशेष व्यवस्था वारकऱ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणारी आहे. यामुळे भाविकांना निर्धास्तपणे माउलींच्या चरणी लीन होता येणार आहे.
माधव खांडेकर यांनी सर्व वारकऱ्यांना आणि भाविकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अडचणींसाठी आळंदी नगरपरिषदेशी संपर्क साधावा. “हा महोत्सव संत ज्ञानेश्वर माउलींच्या विचारांचा आणि भक्तीचा संदेश जगभर पोहोचवण्याची संधी आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत की, प्रत्येक वारकऱ्याला येथे येऊन आनंद आणि समाधान मिळावे,” असे त्यांनी नमूद केले.
या महोत्सवाच्या निमित्ताने आळंदी शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750 वा जन्मउत्सव हा सोहळा वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे.