Sunday

03-08-2025 Vol 19

आळंदीजवळील धानोरेत विषारी सांडपाण्यामुळे ३२ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, धनगर कुटुंबावर आर्थिक संकट

आळंदी वार्ता: आळंदीजवळील धानोरे येथील एमआयडीसी परिसरात संतोष मारुती ठोंबरे यांच्या धनगरवाड्याजवळ कंपनीच्या सांडपाण्यामुळे ३२ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. या पालापासून काही अंतरावर पडरानात शेळ्या-मेंढ्या चरत असताना कंपनीने सोडलेले रासायनिक सांडपाणी पिल्याने विषबाधा झाली. यात २०-२२ शेळ्या आणि उर्वरित मेंढ्यांचा समावेश आहे, तर ५-६ शेळ्या-मेंढ्या गंभीर अवस्थेत आहेत.

संतोष ठोंबरे यांनी सांगितले की, जवळपास २०० शेळ्या-मेंढ्यांपैकी ३२ चा मृत्यू झाला, ज्यामुळे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आळंदी पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकारी दाखल झाले. त्यांनी मृत शेळ्या-मेंढ्यांचा पंचनामा केला आणि काहींना लस देण्यात आली. मृत शेळ्या-मेंढ्यांना वाहनातून एका ठिकाणी नेऊन जेसीबीच्या साह्याने खड्डा खणून त्यात पुरण्यात आले. पशुवैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठोंबरे आणि त्यांच्या चुलत भावाने शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. स्थानिकांनी कंपनीच्या विषारी सांडपाण्यामुळे जीवितहानीचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली आहे. “अशा कंपन्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी परिसरातून होत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, सांडपाण्याच्या रासायनिक तपासणीची मागणी जोर धरू लागली आहे.

alandivarta