Wednesday

30-07-2025 Vol 19

माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी २४० आळंदीकर तरुणांना मंदिरात प्रवेश; बैठकीत निर्णय

आळंदी वार्ता: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीमध्ये तयारी जोरात सुरू आहे. यंदा १९ जून रोजी रात्री ८ वाजता होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी स्थानिक तरुणांच्या देऊळवाडा मंदिरात प्रवेशाच्या मर्यादेबाबत संख्या निश्चित करण्यात आली असून केवळ 240 तरुणांना प्रवेश दिला जाणार आहे. खांद्यावर पालखी वाहणाऱ्या ग्रामस्थांसाठी पांढऱ्या रंगाच्या वस्त्रांचा ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला आहे. याबाबत शनिवारी (दि. १४ जून) आळंदी देवस्थानच्या भक्तनिवासात झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, मंदिर व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संजय घुंडरे, डी. डी. भोसले, राहुल चिताळकर, प्रशांत कुऱ्हाडे, नंदकुमार कुऱ्हाडे, विष्णू वाघमारे, संकेत वाघमारे, आदित्य घुंडरे, मृदुल भोसले, विलास घुंडरे, सागर रानवडे, रोहिदास तापकीर, सुदीप गरुड तसेच आळंदीकर ग्रामस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काटेकोर नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान वीणा मंडपात पालखी खांद्यावर घेण्याचा मान परंपरेनुसार आळंदीकर ग्रामस्थांचा आहे. यंदा केवळ २४० स्थानिक तरुणांना मंदिरात प्रवेशासाठी विशेष पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मंदिरात प्रवेश करताना प्रत्येकाने पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच, वीणा मंडपात पालखी नाचवू नये आणि कोणताही वादविवाद टाळावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

मानाच्या 47 दिंडीतील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना प्रवेश –

मागील वर्षीच्या नियोजनानुसार, मानाच्या दिंडीतील ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय यंदाही कायम ठेवण्यात आला आहे. प्रस्थान दरम्यान रथाच्या पुढील 27 आणि मागील 20 दिंडीला प्रवेश दिला जातो. देऊळवाडा परिसरात होणारी गर्दी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आळंदी देवस्थान, पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात सुसंवादाने हे निर्णय घेण्यात आले आहेत.

१९ जून रोजी रात्री ८ वाजता पालखी प्रस्थान सोहळा झाल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम आळंदीतील दर्शन मंडप इमारत, गांधीवाडा येथे असेल. दुसऱ्या दिवशी, २० जून रोजी सकाळी ६ वाजता पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. २० आणि २१ जून रोजी पालखी पुणे नगरीत मुक्काम करेल. यानंतर पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. आषाढी एकादशी ६ जुलै रोजी असून, त्या दिवशी माऊलींची पालखी पंढरपूरात दाखल होईल.

नियोजनासाठी सातत्यपूर्ण बैठका-

पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद आणि पोलिस प्रशासन यांच्यात सातत्याने नियोजन बैठका होत आहेत. गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षितता आणि सोहळ्याची शिस्त राखण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. यंदा पालखी सोहळा अधिक सुरळीत आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी सांगितले.

alandivarta